मानसिक सकारात्मकता (Mental Positivity)

मानसिक आरोग्य 


असा कोण आहे जो दिवसभर आपली सोबत करत एकसारखा आपल्या अवतीभवती घुटमळत फिरत बसतो. आपल्या प्रत्येक विचाराला प्रेरणा देतो.आणि नव्या आयडिया सुचवत राहतो. अती लाडावलेल्या आपल्या लेकराचं  करावं तसं आपण त्याचं कौतुक करत राहतो, तो सांगेल ते सगळं काही सतत मान्य करत राहतो. 

• कोण आहे हा हिरो ? हा आहे आपला नकारात्मक विचार (Negative Thoughts) नावाचा एक लबाड छुपा शत्रू. चला ! आज आपण या हिरो सोबत एक छानशी ओळख करून घेऊया.

कोण बरे ही नकारात्मकता ?

• आपल्या जीवनात नकारात्मकता म्हणजे विचारांचा सतत वाहता एक असा प्रवाह आहे, जो आपल्या मनाला, भावनांना आणि कृतींना वाळवी सारखा हळूहळू पोखरत राहतो.

• नकारात्मकता म्हणजे निराशा, चिंता, असुरक्षितता, राग, मत्सर, हेवा, आत्मविश्वासाचा अभाव आणि काहीतरी वाईट होणार आहे, काही तरी संकट येणार आहे असं सतत वाटत रहाणं. आनंद  हळूहळू हरवत जाणं.

नकारात्मकता कोणकोणत्या गोष्टींत दिसून येते?

नकारात्मक विचार अनेक स्वरूपात प्रकट होत असतात

✓ एखाद्या गोष्टीबद्दल सतत तक्रार करत रहाणे.(किरकिरेपणा)

✓ स्वतःवर विश्वास न ठेवणे (आत्मविश्वासाचा अभाव)

✓ दुसऱ्यांच्या यशाने अस्वस्थ होणे (आत्मसंतुष्टतेचा अभाव)

✓ अपयशाची भीती वाटणे. (हळवी मानसिकता)

✓ माझ्याकडून काहिही होत नाही, होणारच नाही असा विचार मनात बाळगणे.  (नाऊमेदीपणा)

नकारात्मकता आपल्या मनात कशी घुसते?

✓ नकारात्मकता सुरुवातीला एखाद्या मच्छर सारखी लक्षातही येणार नाही अशी खूप सूक्ष्म पद्धतीने आपल्या मनात घुसते.

✓लहानशा अपयशातून, एखाद्याने आपल्यावर केलेल्या टिकेतून, किंवा स्वतःची तुलना दुसऱ्याशी  करत राहिल्याने ही नकारात्मकता सतत वाढत राहते.

✓ आपलं टिव्हीवर एकसारखे न्यूज पाहत राहणं नकारात्मकता नियमितपणे वाढवतं.

- नकारात्मकता दाखवणाऱ्या बातम्या, खून, फसवणूक, बलात्कार, चोरी , दरोडा. इत्यादी  (जणू जगात चांगलं असं काही घडतच नाही. 

- दु:ख भोगणाऱ्या,  तुझ्याच करिता जगेन, तुझ्याच करिता मरेन, तुझे सर्व त्रास हसत झेलेन असं म्हणणाऱ्या आदर्श सहनशील नायिका असणाऱ्या सिरिअल नेमाने पाहणं.

-  अशा प्रकारे सोशल मीडियावर दुसऱ्यांची सततची दु:खे पाहून आपणही दुःखी होतो. टाईमपास करिता रोज अशा प्रकारचे कार्यक्रम पाहत राहिल्याने नकारात्मक विचार आपल्या मनात खोलवर रूजत जातात. आणि आपल्या नकळत ही यादी वाढत रहाते.

आपण नकारात्मकतेला कसे बळी पडतो आणि त्याचे आदी बनतो ?

✓ जर आपण सतत स्वतः वर लक्षं ठेवून. सतर्कता बाळगून स्वतः ला सावध केलं नाही तर ही नकारात्मकता आपल्या नित्य सवयीचा एक भाग बनते.

✓ मग कोणतीही गोष्ट सुरुवात करण्याआधीच आपण नकळतपणे अनेक गोष्टीं विषयी शंका कुशंका सुरू करतो. प्रत्येक गोष्टीकडे फक्त नुकसान याच दृष्टिकोनातून पाहतो. यामधून आपण हरतो आहोत ही  भावना वाढीला लागते.

✓ यातून आपण आपले आत्मभान हरवतो,  आपल्याही नकळत आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. अशा सतत येणाऱ्या अनुभवानंतर आपली नकारात्मकता साचून राहिली, की मानसिक आजारही उद्भवू शकतात.

✓ कोणते विचार आपल्यात ऊर्जा निर्माण करतात आणि कोणते आपली ताकद काढून घेतात, याची  आपण जाणीव करून घेणं अत्यंत आवश्यक असतं.

नकारात्मकता येऊ नये म्हणून कसे अलर्ट रहावे?

✓ आपणच आपले पालक होणं इथे आवश्यक ठरतं. सतत स्वतःच्या विचारांकडे लक्ष देत रहाणं कठीण आहे पण अशक्य नाही. निगेटिव्ह विचार मनात येत तर नाहीत ना ! या विषयी आपण सतत दक्षं रहायला हवं.

✓ कोणते विचार आपल्यात ऊर्जा निर्माण करतात आणि कोणते आपली ताकद काढून घेतात, याची आपण जाणीव करून घेणं इथे आवश्यक ठरतं.

✓ काही माणसं सतत रडणारी असतात. भेटल्या भेटल्या ते केवळ नकारात्मक अनुभवांचाच पाढा वाचायला  सुरुवात करतात.

✓ उदाहरणार्थ : 

• अमक्याने तमक्याला फसवलंच की रे.

• ती बाई इतकी शांत आणि सहनशील गेली की त्या डफर सोबत पळून. 

• आदर्श म्हातारा फार कायदे शिकवत बसायचा आता झालाय करोडपती, धंद्यातून भागीदाराला फसवून इत्यादी.

✓ अशा लोकांपासून दूर रहा जे आपल्यावर आपल्या नकळत सतत नकारात्मक परिणाम करत राहतात. आणि आपणही सहज ते होऊ देतो.

मग मी अशा वेळी मी करावं तरी काय ?

✓ स्वतः च्या विचारांना प्राधान्य देऊया. ऐकण्यात आणि पाहण्यात आलेली प्रत्येक गोष्ट स्विकारण्यापूर्वी एकदा तपासून  मगच पुढे चलुया.


जर आपण या मानसिक नकारात्मकतेला बळी पडलो तर कसे जागे व्हावे?

✓ आधी हे मान्य करा की आपण नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकलो आहोत.

✓ स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधा.

✓ एखाद्या विश्वासू व जवळच्या व्यक्तीसोबत आपल्या भावना शेअर करा. अनुभव सांगा.

✓ प्रेरणादायी पुस्तके वाचा, ध्यानधारणा करा.

✓ कुठलीही गोष्ट बदलायला आता फार उशीर झाला आहे, असे कधीही समजू नका. 

ही नकारात्मकता पळवून लावण्यासाठी काय करावे?

✓  जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा त्यांना आव्हान द्या “ही गोष्ट सकारात्मक रित्या कशी पाहता येईल ?"

✓ दररोज किमान १० ते २० मिनिटे  शांत ठिकाणी बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. ध्यानधारणा मन शांत निवांत करते अनेक नकारात्मक विचार दूर करते. 

✓ दररोज ३ गोष्टी लिहा, ज्या बद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. आयुष्यात अनेक आनंददायी गोष्टींकडे आपण सतत दुर्लक्ष करतो फक्त वाईट गोष्टींना प्राधान्य देत राहतो.

✓ सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. त्यांचे विचार समजून घ्या. युट्यूबवरही अशी अनेक चॅनल्स आहेत जिथे सकारात्मकता शिकवली जाते. 

✓आपल्या यशांचा आणि चांगल्या क्षणांच्या आठवणी ठेवत जा. भलेबुरे दिवस येत जात रहाणार. प्रत्येक जण त्यातून जात असतो.


मनाला नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यासाठी मानसिक व्यायाम

१. सकारात्मक वाक्ये (Affirmations): “मी समाधानी आहे”, “माझ्या आयुष्यात आनंद आहे”  अशी वाक्ये स्वतः सोबत बोलत जा.

२. दैनिक ध्यानधारणा( मेडिटेशन) ज्यामुळे आपले मन  शांत निवांत राहते आणि आपली आत्मजागरूकता वाढत जाते.

३. योग व प्राणायाम: श्वसनावर नियंत्रण मिळालं की विचारांवरही मिळतं. 

४. स्वत:शी संवाद: “आज मी काय चांगलं केलं?” हा प्रश्न स्वतःला रोज विचारा. मग त्याचं उत्तर: "चिऊला दाणे खाऊ घातले, गायींना चारा घातला, भोभोंना पाणी पिऊ घातलं" असं का असेना. आनंद तर मिळतोच.

५. रोज थोडा वेळ धन्यवाद देण्यासाठी द्या. आपण या दुनियेत अनेक लोकांचे आभारी असतो जे कळत नकळत आपल्याला मदत करत असतात.

✓नकारात्मकता दूर केल्यावर पॉझिटिव्ह अनुभव येतात,

✓मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण होतो.

✓विचारशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते.

✓नातेसंबंध सुधारतात.

✓  व्यक्तिमत्त्व तेजस्वी वाटू लागतं.

✓ जीवनात खऱ्या अर्थाने शांती व समाधान अनुभवता येते.

अखेर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.  जीवनाच्या या प्रवासात आपला नकारात्मकते कडून सकारात्मकतेच्या दिशेने  अखंड प्रवास सुरू  राहणार आहे  हे ध्यानात ठेऊया आणि बदल घडवुया.

• शुभेच्छा. 🌹

Comments