कमी बोलण्याचे फायदे (Benefits of Speaking Less)
कमी बोलण्यामुळे होणारे फायदे
(Benefits of Speaking Less)
आपण दिवसभर न थकता बडबड करत रहातो. घरात , घराबाहेर, मित्र मैत्रिणींध्ये, नातेवाईकांत, परिचितांमध्ये , ऑफिसमध्ये सहकर्मचाऱ्यां सोबत, ट्रेनमध्ये गृप जमवून, सगे सोयरे यांचे सोबत. अगदी भाजीवाला असो किंवा फिरता विक्रेता असो. जो बकरा भेटेल त्याला पकडून आपण अखंड बडबड करत राहतो. जणू एखादा जन्मसिद्ध हक्कच बजावतो. पण हीच सवय आपलं बरंचसं नुकसान करून जाते.
समाजात आपले परिचित सतत आपले नको तितके सततचे बोलणे ऐकून अगदी कंटाळून जातात. आणि यातून सामाजिक अलगाव निर्माण होऊ शकतो आणि अर्थपूर्ण नाती जोपासण्यात, आणि आपल्या माणसांशी संवाद साधण्यात खरंच खूप अडचणी येऊ शकतात. पाहूया काय असू शकते हे नुकसान...
सामाजिक आणि नातेसंबंधांवर होणारे परिणाम:
१) नातेसंबंध बिघडणे:
जेव्हा कोणी खूप जास्त बोलते, तेव्हा इतरांच्या मनात, "हा माझे ऐकत नाही, स्वतः चीच टिमकी वाजवतो" अशी भावना निर्माण होते. अशा बोलणाऱ्याला कमी भाव दिला जाण्याची भावना यातून येऊ शकते. यातून नातेसंबंध तणावग्रस्त होतात. आणि हळूहळू या बडबड्या व्यक्तीला आपल्याला दुर्लक्षित केले जात आहोत याचा नित्य अनुभव यायला लागतो. यात चुक कोणाची ? विचार करा.
२) सामाजिक दुरावा:
जेव्हा एखादी व्यक्ती संभाषणात स्वतःचेच वर्चस्व गाजवत राहते, तेव्हा लोक अशा व्यक्ती सोबत संवाद साधण्याचे टाळतात. परिणामी, त्या व्यक्तीला सामाजिक दुराव्याचा आणि वाळीत टाकल्या सारखा कंटाळवाण्या नातेसंबंधांचा सामना निश्चितच करावा लागू शकतो. असे अनुभव घेणे तुम्हाला आवडेल का ?
३) तुमचा प्रभाव कमी होणे:
अति बोलण्यामुळे व्यक्तीचा समाजातील प्रभाव कमी कमी होत जातो. जर तुम्ही सतत बोलत राहिलात आणि इतरांना बोलण्याची संधीच दिली नाहीत, तर लोक तुमच्या मताला कधीही गांभीर्याने घेणार नाहीत. एक कॉमेडीयन आणि टाईमपास म्हणून तुमच्या कडे पहायला सुरुवात करतील. ते आपल्या प्रतिमेला धक्का लावणारे असेलच. होय ना ?
४) नकारात्मक प्रतिमा:
जर तुम्ही संभाषणावर कायम वर्चस्व गाजवत असाल आणि इतरांना बोलण्याची संधीच देत नसाल, तर लोक तुम्हाला आत्मकेंद्री, असंवेदनशील किंवा उद्धट, आगाऊ नक्कीच समजतील. ज्यामुळे सदर व्यक्तीची समाजात एक नकारात्मक प्रतिमा निर्माण होत जाते. आणि अशा व्यक्तीला हळूहळू जो तो टाळू लागतो. आपण टाळले जात आहोत ही भावना आनंददायी असू शकेल का ?
५) संवाद साधण्यात येणाऱ्या अडचणी:
अति बोलण्यामुळे माणसाला इतरांसोबत सहज संवाद साधणे फारच कठीण होऊन बसते, कारण त्यांना आपले विचार मांडण्याची, मते सांगण्याची किंवा कोणत्याही चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळत नाही. ते एकटे पडत जातात. काय वाटत असेल, जेव्हा इतरांनी आपल्याला असे एकटे टाकल्याची त्यांना जाणीव होईल ? निराश तर होणारच.
६) ऐकण्याच्या कौशल्याचा अभाव:
अति बोलण्यामुळे आपल्या स्वतःच्या शांतपणे, एकाग्रतेने आणि मनापासून ऐकण्याच्या क्षमतेवर निश्चितच परिणाम होत जातो, ज्यातून मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि अगदी शांत चित्ताने समोरच्याला समजून घेण्याची आपली क्षमता आपणच संपवून टाकतो. आपण यातून काय साध्य करतो ?
७) संधी गमावणे:
स्वतःच्या बोलण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही इतरांकडून मिळणारी महत्त्वाची माहिती, बरेच अनुभव आणि शिकण्याच्या अनेक संधी गमावू शकता. कारण ज्ञान हे या समाजापासूनच आपल्याला मिळत आलेलं आहे, तो समाज अशा माणसापासून स्वतःला तोडू पाहतो. मग करायचं काय ?
८) गैरसमज होण्याची शक्यता:
अति बोलल्याने समोरच्या माणसाच्या मनातील गैरसमज आणि तुमच्या बोलण्याचा चुकीच्या अर्थ लावण्याची शक्यता वाढते. कारण तुम्ही संभाषणातील नॉन-वर्बल (चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्याचा टोन, शिस्तबद्ध भाषा इत्यादी) मॅनर्स सांभाळत बसून चर्चेच्या मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करू शकता.
यावर काय उपाय करता येतील:
१) नीट ऐकण्याचा सराव करा:
इतरांचे बोलणे नीट मनापासून ऐकत चला, समोरच्यांना प्रश्न विचारा आणि त्यावर विचारपूर्वक शांतपणे प्रतिसाद द्या. आपले मत नोंदवा आणि याविषयी तिथल्या इतर उपस्थितांची ही मते जाणून घ्या. त्यांच्या मतांचा आदर करा.
२) सामाजिक नियमांची जाणीव ठेवा
इतर लोक बोलण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा संभाषणाची दिशा बदलत आहे का, याकडे लक्ष असू द्या. त्यांच्या मनात काय भाव आहेत आणि आपल्यात चालणाऱ्या विषयावर इतरांची काय मते आहे हे ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.
३) वेळेची मर्यादा ठेवा:
संवाद साधताना स्वतःसाठी वेळेची मर्यादा ठरवा, जेणेकरून इतरांनाही बोलण्याची संधी मिळेल. थोडे आणि फक्त महत्वाचे मुद्दे मांडणे आपल्या संभाषणाची रूची नक्कीच वाढवेल.
४) प्रतिक्रिया मागा:
तुमच्या बोलण्या विषयी, मतां विषयी किंवा निर्णया विषयी खरे आणि प्रामाणिक मत जाणून घेण्यासाठी विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांची मदत घेत चला.
त्यावर विचार करा. फक्त कौतुक मिळण्याची अपेक्षा न ठेवता. स्वतःत बदल घडवण्यासाठी आपल्या चुकाही जाणून घेत चला.
५) व्यावसायिक मदत घ्या:
जर अति बोलण्यामुळे तुमच्या सामाजिक किंवा वैयक्तिक जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होत असतील, तर समुपदेशक किंवा थेरपिस्टची मदत घेण्याचा विचार करा. स्वतः मध्ये बदल आणि प्रगती फक्त आणि फक्त आपली आपणच करू शकतो.
६) समोरच्याला समजून घ्या:
जेव्हा कुणी आपल्या सोबत समस्या शेअर करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण शांतपणे त्या व्यक्तीचं मन ऐकून घेऊ एवढीच त्यांची अपेक्षा असते. ती पूर्ण करा.
निरोप:
भाषा हे एक असे माध्यम आहे ज्यातून आपण समोरच्या व्यक्तीला जोडू ही शकतो आणि तोडू ही शकतो. भाषेच्या माध्यमातून आपण समाजात आपले आदरणीय स्थान घडवू ही शकतो आणि संपवू ही शकतो. भाषा आणि संवाद तोलून मापून योग्य प्रमाणात वापरात आणल्यास ते एखाद्या उपयोगी औषधाचे काम करू शकते किंवा अती प्रमाणात वापर केला तर त्या उलटही परिणाम दाखवू शकते.
सारांश:
आता हे आपल्या हातात आहे की या वाचा शक्तीला योग्य ते वळण देऊन, स्वतः मध्ये योग्य संस्कार रूजवून, कशा प्रकारे आपल्या जिवलगां सोबत आपले बोलणे संपर्काचे माध्यम बनवू शकतो. शांत रहा. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. नाते रूजवा आणि आपले आणि समोरच्या व्यक्तीचे जगणे सोपे करा. जेणेकरून मन मोकळे करणे आपल्याला आणि समोरच्या व्यक्तीला सुखद होईल.
अखेर, मौनम् सर्वार्थ साधनम्
• शुभेच्छा.
गुगल चे आभार. 🙏
Comments
Post a Comment