उन्हाळ्यातील आजारांवर टिप्स (Tips for Summer Diseases)


 उन्हाळ्यात येणारे आजार 

• उन्हाळा म्हटलं की आपण लग्न कार्य, घरगुती समारंभ आणि दूरवरच्या ट्रिप्स च्या तयारीला लागतो. आनंदाने बॅगा भरतो आणि सर्व एन्जॉय फुल गोष्टींच्या अचूक याद्या बनवतो. पण स्वतःची काळजी घेणं मात्र एक क्षुल्लक गोष्ट समजतो.

• वाढत्या तापमानाचा आपल्या त्वचेवर, डोळ्यांवर आणि पचनक्रियेसह संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. इथे आपण उन्हाळ्यात होणाऱ्या या सर्वसाधारण आजारांची माहिती घेऊया.

• उन्हाळ्यात येणारे सर्वसाधारण आजार 

१. उष्माघात (Heat Stroke)

हा उन्हाळ्यात होणाऱ्या सर्वसाधारण आजारांपैकी एक आजार आहे. दिर्घकाळ सुर्य प्रकाश आणि प्रचंड उष्णतेच्या प्रभावाखाली राहिल्यास उष्माघात होऊ शकतो.



यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे काही नागरिक मृत्यू पावले आहेत. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागांमध्ये उष्णतेमुळे मृत्यू च्या घटना घडलेल्या ऐकू येतात.

* चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, शरीराचे तापमान खूप वाढणे अशी लक्षणे यात दिसून येतात.

घेण्याची काळजी:

* दिवसभर थोडे थोडे पाणी पित रहावे.
* घरात हवा खेळती राहिल हे पहावे.
* चहा कॉफीचा अतिरेक टाळावा.
* कॉटनचे कपडे, गॉगल, टोपी, स्कार्फ बाहेर जाताना आठवणीने घेऊन जावे.
* दिवसांतून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी.

२. अन्न विषबाधा (Food Poisoning)

अन्न विषबाधा हा उन्हाळ्यात होणारा एक सामान्य आजार आहे. दूषित अन्न सेवन केल्यामुळे हा त्रास उद्भवतो.

उन्हाळ्यात असणाऱ्या सततच्या उष्णतेमुळे अन्न लवकर खराब होते कारण उच्च तापमानामुळे जंतूंची वाढ फार झपाट्याने होत रहाते.


कमी शिजवले गेलेले अन्न, अस्वच्छ हॉटेलातून आणलेले अन्न पदार्थ, अशुद्ध पाण्याने बनवलेले अन्न, फ्रिजमध्ये न ठेवता उरलेले शिळे अन्न खाण्यात आल्यामुळे अन्न विषबाधा सहज होऊ शकते.

घेण्याची काळजी:

* उन्हाळ्यात शक्य होईल तितके घराबाहेरचे अन्न खाणे टाळावे. 
* घरी बनवलेले  स्वच्छ  आरोग्यदायी अन्न तयार होताच तासाभरात जेवावे. शिळे अन्न शक्यतो टाळावे.
* मांसाहार, अंडी, तळलेले पदार्थ उन्हाळ्यात शकतो टाळावेत.
* कच्च्या कोशिंबीरी, फळे, दही, ताक असे पचनासाठी हलके अन्न खाण्यासाठी प्राधान्य द्यावे.

३. गोवर आणि कांजिण्या (Measles and Chicken pox)

* गोवर आणि कांजिण्या उन्हाळ्यात होणारे सामान्य विषाणूजन्य आजार आहेत.

* गोवरची लक्षणे म्हणजे अतिशय तीव्र ताप, डोळ्यांतून पाणी वाहत रहाणे, घसा खवखवणे.


* कांजिण्या मध्ये भरपूर ताप, अंगावर येणारे पाण्याने भरलेले फोड, त्वचेला येणारी खाज, डोकेदुखी, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसून येतात.

घेण्याची काळजी:

गोवर आणि कांजिण्यां पासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण करणे आणि संसर्ग झालेल्या व्यक्ति पासून दूर रहाणे.

४. गालगुंड (Mumps)

गालगुंड हा मुलांमध्ये आढळणारा एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. या विषाणूंमुळे संक्रमित झालेले मूल खोकल्यास किंवा शिंकल्यास  हा विषाणू जवळपास असणाऱ्या माणसांमध्ये सहजपणे पसरू शकतो.



या आजारात कानाजवळच्या ग्रंथी सुजतात, वेदना होतात, ताप येतो, गिळताना भरपूर त्रास होतो.

घेण्याची काळजी:

गालगुंड टाळण्याचा एकमेव प्रभावी उपाय म्हणजे MMR लस घेणे. यामध्ये आपले फॅमिली डॉक्टर आपल्याला मदत करतात.

५. टायफॉइड (Typhoid)

हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. या आजारात तीव्र ताप, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, भूक न लागणे अशी लक्षणे दिसून येतात.


घेण्याची काळजी:

* उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यावर तहान लागणार याची जाणीव ठेवून पाणी सोबत न्यावे.

* बाहेर गेल्यावर गाळलेले किंवा स्वच्छ फिल्टर्ड केलेलेच पाणी पिण्याची दक्षता बाळगावी.

* यातील काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.

६. डोळे येणे (Eye Infection or Conjunctivitis)

* उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ, ऍलर्जी, डोळे दुखणे, डोळे येणे सामान्य आजार आहेत.

* या संसर्गामुळे डोळे डोळे लाल होणे, सुजणे, डोळ्यात सतत टोचले गेल्याची जाणीव होणे, डोळ्यांतून पाणी वाहत रहाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.


घेण्याची काळजी:

* घराबाहेर पडताना गॉगल लावूनच निघावे.

* बाहेर गेल्यावर व घरी आल्यावरही हात निर्जंतुक साबणाने जोवर हात स्वच्छ धुवत नाही तोवर डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.

* शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पीत रहाणे.

* आपल्या वैयक्तिक वापरात असणाऱ्या गोष्टी (रूमाल, टॉवेल, गॉगल इ.) इतरांना न देणे व इतरांच्या न वापरणे.

* रोज नित्य नियमाने दिवसांतून दोनदा तरी डोळे धुण्याची सवय ठेवावी. (नेत्रस्नान)

फ्लू (Flu)

* उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच, हवामान बदलास सुरूवात होते तेव्हा फ्लू ची साथ येणे सामान्य आहे.

* मुख्यतः हवेत असणाऱ्या पराग कणांमुळे होणारा हा एक ऍलर्जिक स्वरूपाचा त्रास आहे.


* विशेषतः जेव्हा शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते तेव्हा हा आजार होऊ शकतो.

* ताप, थकवा, नाक बंद होणे, डोळ्यांतून पाणी येत रहाणे अशी याची लक्षणे दिसून येतात.

घेण्याची काळजी:

* मास्कचा वापर करावा.
* डॉक्टर कडे जाऊन फ्लू ची लस घ्यावी.
* स्वच्छ, निरोगी जीवनशैली ठेवावी.
* रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करावी.

८. डिहायड्रेशन (Dehydration)

* उन्हाळ्यात जास्त घाम येण्यामुळे शरीरातील खनिजे आणि द्रव पदार्थ कमी होत जाऊन इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते.


* जर या द्रव्यांच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी पुरेसे द्रव्य पोटात गेले नाही तर डिहायड्रेशन होऊ शकते.

घेण्याची काळजी:

* मद्यपान टाळावे, साखर युक्त किंवा कॅफिनयुक्त पदार्थ टाळावेत.

* अशक्तपणा किंवा डिहायड्रेशन जाणवत असेल तर शरीरात गमावलेले जल पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी इलेक्ट्रॉल युक्त पेय आवर्जून प्यावे.

९. डोकेदुखी (Headache)

* उन्हाळ्यात दिर्घकाळ प्रखर सूर्यप्रकाश आणि अती गरम वातावरणात राहिल्यास तीव्र डोकेदुखी अनुभवास येऊ शकते.

घेण्याची काळजी:

* द्रव पदार्थाचे सेवन जास्त करावे.
* हंगामी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा.
* अती प्रमाणात व्यायाम करणे टाळावे.
* गॉगल टोपी उन्हाळ्यात सतत वापरावे.
* डोकं झाकूनच बाहेर पडावे

१०. त्वचेच्या समस्या (Skin Allergy)

* उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेचा त्वचेवर तीव्र परिणाम होत राहतो.
* यातुनच पुढे त्वचेचे आजार उद्भवू शकतात.



* मुरमं, संसर्गजन्य आजार, त्वचारोग, अंगावर लाल चट्टे उठणं हे त्रास जाणवतात.
• एक्झिमा, बुरशी संसर्ग इ.‌ त्रास उद्भवतात.

घेण्याची काळजी:

* त्वचा स्वच्छ, कोरडी आणि झाकलेली असावी.
* बुरशीजन्य आजार न होण्यासाठी ऍंटीफंगल क्रिम्स वापरावी.
* अंगावर काढणं किंवा घरगुती उपाय करत राहणं टाळून सर्व प्रथम त्वचा रोग तज्ञांची भेट घ्यावी.

सारांश:
• ऋतू हे सुंदरच असतात. बदलत्या ऋतूंचा आनंद लुटताना आपण सदैव जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.

• निसर्ग त्याच्या हातांनी आपल्यावर नैसर्गिक प्रेम सदैव उधळत राहणार. मात्र त्याच्या ऋतु  बदलाचे स्वागत करण्यासाठी आपण आनंदी, निरोगी आणि आरोग्यपूर्ण असणं आवश्यक आहे.

• येणाऱ्या उन्हाळ्या करिता आपल्याला अनेक शुभेच्छा.

• गुगलचे आभार.

Comments