क्रोध: नुकसान (Disadvantages of Anger)
क्रोध आणि त्या सोबत होणारे नुकसान
• आयुष्यभर हातात हात घालून आपल्या सोबत चालणाऱ्या त्या सहा जिवलग मित्रांना ओळखायलाच आपण अर्धी हयात घालवतो. अखेर, ह्या मित्रांची खरी ओळख पटे पर्यंत भरपूर उशीर होतो. आणि जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा यातल्या नक्की कोणत्या मित्राला कसं ओळखायला चुकलो याची जाणीव होई पर्यंत खूप उशीर झालेला असतो.
• ते सहा मित्र म्हणजे षड्:रिपू. अर्थातच माणसाचे सहा छुपे शत्रू : १) काम २) क्रोध ३) लोभ ४) मोह ५) मद ६) मत्सर. ज्यांना आपण आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान देतो.
• हे सगळे शत्रू एकजात छुपे महारथी आहेत. मात्र त्यांच्यातला एक जण इतरांहून निराळा आहे. जो छुप्या रीतीने नव्हे तर उघडपणे माणसाला "ना घर का, ना घाट का" असा स्पेशल "धोबी का कुत्ता" बनवून ठेवतो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर तो आपल्याला समाजातही छी: ! थू: ! मिळवून देतो आणि आपल्या नात्यांतही आपली ओळख "एक कटकट"अशी बनवतो. घरच्या सदस्यांकडूनही आणि समाजातील सदस्यांकडूनही टाळलं जातं. सगळेच जण अशा माणसापासून पळ काढत राहतात.
• कोण हा शत्रू ? तर त्यांचं नाव आहे क्रोध. अर्थात राग, कोप, संताप अशा विविध नावांनी हे महाशय प्रसिद्ध आहेत.
• राग आटोक्यात न ठेवता आल्यामुळे सतत होणारे वाद विवाद आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य पार ढवळून निघतं. आणि त्यामुळे होणारं नुकसान उमजेपर्यंत आपण जीवनात खूप दूरवर येऊन पोहोचलेलो असतो, जिथून परतणं पूर्णतः अशक्य असतं. शेवटी नाईलाज म्हणून आपण त्या उणिवांतुन मार्ग काढत पुढे चालत राहतो.
• या लेखातून रागीटपणापायी येणारे संभाव्य त्रास आणि त्यातून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो यांवर एक दृष्टिक्षेप टाकुया.
१) भांडण म्हणजे काय?
भांडण म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारे विवाद. क्रोधातूनच भांडणाचा जन्म होतो.
२) भांडणातून होणारा मानसिक त्रास.
• भांडणातून आपल्या मेंदूत "स्ट्रेस हार्मोन्स" वाढीस लागतात. यातुन चिंता, मनस्ताप, रोजचा तणाव असे मानसिक त्रास दिवसेंदिवस वाढतच राहतात.
• मी म्हणेन तेच खरं किंवा माझं प्रत्येक म्हणणं मान्य केलंच पाहिजे अशी भूमिका निर्माण होते. हळूहळू हट्टीपणा, घमेंडीपणा हा नित्य सवयीचा एक भाग बनतो. माणूस एकटा पडत जातो.
• यातून हळूहळू आडमुठेपणा वाढत जाऊन आपलंच म्हणणं खरं करण्याची सवय जडते. स्वतः ची चुक स्वतःशीच असो किंवा इतरांसोबत असो, ती मान्य न करण्याच्या सवयीमुळे घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात.
३) आजारपण वस्तीला येते.
• हा रागीट स्वभाव उच्च रक्तदाब आजार उत्पन्न करतो (High Blood Pressure).
• पुढे याचे पर्यवसन गंभीर ह्रदयविकाराच्या आजारात सहजपणे होत जाते.
• निद्रानाश हे देखील याचेच एक कारण असल्याचे दिसते. अपुऱ्या झोपेमुळे अनेक त्रास वाढतच राहतात. यातूनच पुढे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होण्याची शक्यता निर्माण होते.
• पचनसंस्थेचे कार्य अनियमित होते कारण पचनासाठी आवश्यक रसायने निर्माण करण्यास शरीर प्रतिबंध करते. परिणामी पोटदुखी, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता (Constipation), अतिसार (Dysentery),अपचन, ऍसिडिटी, पोट फुगणे (गॅसेस) हे आजार निद्रानाश आपल्या सोबत घेऊन येतात.
४) समाजातले स्थान तपासुया :
• मानसिक अशांतता ही खरंच सर्वच बाजूंनी जगणं कठीण करताना आढळते. अशा व्यक्ती प्रत्येक कामात चिडचिड करताना दिसून येतात.
• अशा सतत विवाद उत्पन्न करणाऱ्या माणसांना समाज घरी बोलावणं, समारंभात येण्यासाठी आमंत्रण देणं टाळतात. ज्यामुळे अशा क्रोधी माणसाच्या कुटूंबातील माणसांना घरात आणि घराबाहेर देखील या व्यक्तीमुळे मनस्ताप सोसावा लागतो.
५) यातून मार्ग कसा काढूया ?
• शांत राहण्याची सवय करायला हवी. मन शांत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत रहायला हवेत. आपले स्वप्रयत्नच आपल्याला बदलू शकतात.
• स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी प्रयत्न करणे यात अनिवार्य ठरते. मी कोणतीही गोष्ट असेल : शांतपणे ऐकून घेईन, त्यावर क्षणात आपली प्रतिक्रिया न देता शांतपणे निर्णय घेईन, समजून घेणं, शांतपणे विचार करणं, आणि मगच त्यावर आपली प्रतिक्रिया देणं अशा सवयी आपण स्वतःला लावून घ्यायला हव्यात.
• कोण चूक कोण बरोबर हे ठरवणारे आपण न्यायाधिश नाही याची सदैव जाणीव आपण ठेवणं आवश्यक आहे. मग त्या आपल्या कुटूंबातील व्यक्ती असतो किंवा समाजात भेटणाऱ्या.
६) कुटूंबाची मदत घेऊया :
• कुटूंब आपल्याला एक उबदार संरक्षण देते. इथली प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या विश्वासावर जगत असते. आयुष्यात खूप बरेवाईट प्रसंग येतात. परिस्थितीचे चढ उतार ऋतूंसारखे येत जात राहतात. अशा वेळी कुटूंब ढाली सारखं आपल्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतं. आणि म्हणूनच कुटूंबाचा आदर ठेवणं आपलं प्रथम कर्तव्य ठरतं.
• कुटूंबात रमण्याचा आनंद जगाच्या कोणत्याही बाजारात विकत मिळणार नाही. जोडीदार आणि चिमण्या पाखरांनी विश्वासाने आपल्या खांद्यावर ठेवलेली मान आयुष्यातला मोठा आनंद आहे.
७) योगाभ्यासाची मदत घेऊया.
✓ दिर्घ श्वसन रोज नियमित करत जाऊया.
✓ श्वसनाचे व्यायाम नीट शिकुन दररोज करूया.
✓ आसने, प्राणायम, सुरू करुया.
✓ स्वतः च्या दिनक्रमाची नित्य नोंद ठेऊया.
✓ स्वतःचे निरिक्षण करून वागण्याची नोंद ठेऊया.
• निष्कर्ष:
• वाद हे फक्त तात्पूरते असतात, पण ते आयुष्यात खूप मोठा फटाका देऊन जातात.
• सतत चिडचिड, वादविवाद, इतरां सोबत स्पर्धा, स्वतःचं महत्त्व जास्त असल्याचं दाखवणं अशा स्वभावाच्या व्यक्ती कालांतराने प्रयत्न करूनही शांत विचारसरणी आचरणात आणू शकत नाहीत.
• सतत स्वतःचा मोठेपणा दाखविण्याच्या मानसिक इच्छेतून आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या पासून तोडतो.
• पुन्हा पुन्हा तेच तेच अनुभव मन कटू करतात जी नाती पुन्हा जुळणं अशक्य होऊन बसतं.
• आणि म्हणूनच, रागावर ताबा मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे, ध्यानधारणा, जप व मंत्राची मदत घेणं, वेळेला ठराविक डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक ठरतं.
• शांत स्वभाव आणि समंजसपणा हे गुण आपल्याला नेहमीच शारीरिक, मानसिक, सुरक्षितता देतात. समाजात मान सन्मान, आणि समाजाकडून आग्रहाचे आमंत्रण मिळवून देतात.
• आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊया. योग्य अयोग्य फक्त इतरांचे नाही तर सर्वप्रथम स्वतः चे नियम ठरवून त्यावर अंमल करूया. स्वनिरिक्षण करत जाऊया.
• रागावर ताबा मिळवून एक शांत आदरणीय व्यक्ती बनण्याचा कायम प्रयत्न करूया. ज्याचा फायदा सदैव आपणच घेणार आहोत.
• शुभेच्छा.🌹
गुगलचे आभार.
Comments
Post a Comment