मानसिक आरोग्य (Mental Health)



• एकविसाव्या शतकात जगणं हा खरोखरीच एक सुंदर अनुभव आहे. विविध आधुनिक उपकरणांनी जीवनातील विविध अनुभवांमध्ये स्वयंपाक घरात घराचं मॅनेजमेंट चालवताना, ऑफिस मध्ये कामाचं व्यवस्थापन तयार करताना, अगदी प्रत्येक पावलावर आपलं आयुष्य सर्वच ठिकाणी तंत्रज्ञानामुळे खूपच सोप्पं केलंय. मात्र तरीही आपण काही तरी हरवतोय. आज आपली मन:शांती संपत चालली आहे, जुन्या आठवणींत असणारी आपली प्रसन्न मन:स्थिती, नात्यांमधील उबदार जवळीक, सुंदर रंगलेल्या गप्पा, शब्दाविना संवाद हे सगळं हरवलंय त्याजागी बेचैनी, मानसिक ओढाताण, अस्वस्थता, वाढताना दिसत आहेत. होय, आपण मानसिक आरोग्य गमावतोय.

मानसिक आरोग्य म्हणजे काय ?

• मानसिक आरोग्य म्हणजे एक सुदृढ मन.
जे मन आयुष्यात येणाऱ्या लहान मोठ्या ताणतणावांना, संघर्षाला, बदलणाऱ्या परिस्थितीला स्विकारण्याची तयारी ठेवतं.
• परिस्थिती लवचिकपणे हाताळण्याची तयारी बाळगतं.
आणि हिम्मतीने येईल त्या परिस्थितीला  सामोरे जाण्याची तयारी ठेवतं. 
• अन्याया विरूद्ध दोन हात करण्याची क्षमता ठेवतं तेच आपलं सुदृढ मन होय जे आपल्याला दाखवतं आपलं मानसिक आरोग्य नेमकं कसं आहे.


मानसिक आरोग्याचं महत्व काय?

शारीरिक आरोग्या इतकचं मानसिक आरोग्यही महत्वाचं आहे हे आपण विसरतो.

१. मानसिक सुदृढता आपल्याला आयुष्यात येणाऱ्या तणावांचे संतुलन योग्य रित्या करायला आपल्याला शिकवते. समस्येला घाबरून तिच्या पासून पळून जायचे नसुन निधड्या छातीने सामोरं जायचं आहे हे आपली मानसिक सुदृढता ठरवते.

२. घरांत, नात्यांत, समाजात, नोकरी धंद्यात अगदी सर्वत्र कमी जास्त प्रमाणात अनुभास येणारे वाद विवाद, अपमान, राजकारण, कट कारस्थाने, चढाओढी अशा अनुभवास येणाऱ्या अनेक गोष्टी सहजपणे स्विकारून त्यावर शांत चित्ताने विचार करून आपण यातुन मार्ग काढू शकतो.

३. चांगल्या मानसिकतेमुळे आपण आपले वागणे उत्तमरित्या इतरां समोर सादर करू शकतो. ह्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला मानसिक रित्या खचवु शकत नाहीत. त्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याची जिद्द मदतीला येते. आणि पुढचे मार्ग दिसत जातात. आनंदाने आयुष्यात अनेक चॅलेंजेस स्विकारायला आपण हिमतीने पुढे सरसावतो.


• मानसिक आरोग्य कसं बिघडतं ?

१. कामाचा अतिरिक्त ताण स्वभाव चिडचिडा करतो.
२. आपली इतरां सोबत होणारी तुलना आणि त्यातून चालणार भेदभाव पाहून मन दुखावलं जातं.
३. दिर्घकालीन चालणारी आजारपणं आर्थिक रित्या झोडपून काढतात आणि आपण शारीरिक मानसिक दोन्ही दृष्ट्या हळूहळू थकत जातो.
४. रात्री झोप न येणं हा अनुभव येत असेल तर, अपूऱ्या झोपेमुळे मन:स्थिती बिघडत जाते.
५. पोषणमूल्यांचा आहारात तुटवडा असल्यास आरोग्य ढासळत जाऊन झोपेवर परिणाम झालेला दिसून येतो.
६. या व्यतिरिक्त असंख्य गोष्टी मानसिक अशांती निर्माण करत असतात.


• मानसिक आरोग्य सुदृढ कसे ठेवु ?

१. सकारात्मक जीवनशैली: (Positive Attitude)
• आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून (Positive way) पाहूया.
• तणाव आला तरिही त्याचा सामना करण्यासाठी धैर्य बाळगून जगुया.
• आपल्या वाईट अनुभवात इतरांच्या मदतीची वाट न पाहता मीच माझा रक्षणकर्ता हे ध्येय बाळगुया.
• मी यातून बाहेर येणार हे ध्येय कायम ठेवुया.

२. भूतकाळ सोडून द्या: (Forget the Past)
• जे झालं ते भुतकाळातच संपलं. त्या घटनेला आपल्या सोबतपुढे घेऊन जायचं नाही हा निश्चय मनाशी करूया.
• फक्त आज आणि आत्ता या वास्तवात मी जगणार, फक्त वर्तमान काळात जगण्याची भावना ठेवून मी प्रत्येक क्षण भरभरून जगणार हा निश्चय आपण स्वतः सोबत करूया.

३. नियमित व्यायाम: (Daily Exercise)
• शारीरिक हालचालींमुळे मेंदू मध्ये ऍन्डॉर्फिन (Endorphins) नावाचे रसायन तयार करते, ज्यामुळे तणाव कमी होऊन मन आनंदी रहाते, आपल्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात
• रक्तदाब नियंत्रणात रहातो. ज्यामुळे पुढे येणारे अनेक अनर्थ टाळता येतात.
• मनात सकारात्मक भावना (Positive Feelings) निर्माण होतात, स्नायू सक्षम होतातच, त्याच बरोबर अतिरिक्त चरबी कमी होऊन व्यक्तिमत्व देखणे आणि प्रभावी बनते. सुंदरता वाढते.

४. ध्यानधारणा: (Meditation)
• ध्यानधारणा म्हणजे मनाला शांत करण्याचे साधे व सोपे साधन.
• ज्यामुळे श्वसनाचे तंत्र सुधारते, मानसिक तणाव संपतो
• मनाची एकाग्रता वाढते आणि डोकेदुखी, अस्वस्थता, बेचैनी यातून कायमस्वरूपी सुटका होते.

५. संवाद साधा: (Communicate with others)
• आपल्या जवळच्या माणसाला आपले मन सांगत चला, हा परस्पर संवाद मनावरचा ताण सहज दूर करेल. जवळच्या व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. मन हलकं होईल.
• जर हे शक्य झालं नाही तर एक डायरी ठेवा. रोज त्यात आपल्या भावना, आठवणी, अनुभव लिहून ठेवा. आपल्या मनात साचलेलं सगळं काही ही डायरी स्वतः मध्ये सामाऊन घेईल. एका मैत्रीणीची भुमिका बजावेल.


६. पुरेशी झोप घ्या: (Sound Sleep)
• प्रौढांसाठी दररोज निदान दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक ठरते. म्हणूनच दुपारची झोप टाळून आणि रात्री झोपण्यापूर्वी १ तास आधी मोबाईल, टी.व्ही इत्यादि इलेक्ट्रॉनिक साधने बंद करून शांतपणे रोजच्या नियमित वेळेवर झोपी जाण्याची सवय मनाला भरपूर निवांतपणा देते.


७. छंद लावून घ्या: (Adopt Hobbies)
• स्वतःला एक छंद लावून घ्या. त्या छंदा करिता रोज ठराविक वेळ राखुन ठेवा. त्यामुळे मन रिकामे न राहता, मन:स्थितीत आनंद निर्माण होत राहिल.
• वाचन, पेंटिंग, लेखन, गाणी ऐकणे, रोज अर्धा ते एक तास चालणं अशा गोष्टी मनात आनंद निर्माण करतील. हे छंद आयुष्य आणखी सोपे करतील.

• मानसिक तज्ञांची मदत
✓. कोणत्याही कामात लक्षं न लागणं.
✓. आयुष्यातला आनंद हरवल्या सारखं वाटत रहाणं‌.
✓. भुक न लागणं, शांत झोप न येणं.
✓. दिवसेंदिवस चिडचिड वाढत जाणं.
✓. निराशा वाढत जाणं.
✓. आत्महत्येचे विचार मनात येत राहणं.


अशी लक्षणं आढळल्यास आपण स्वतःहून मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकांची भेट घ्यावी व आपला तणाव व होणारा त्रास त्यांना सांगावा. समुपदेशना (Counselling) च्या मदतीने आणि आवश्यकता भासल्यास त्यांनी सांगितलेल्या औषधांच्या मदतीने या निराशेवर सहज मात करता येऊ शकते. शेवटी आपली मदत ही आपणच करायची आहे.

• कधीच निराश होऊ नका
रात्र ही फक्त काही तासांची असते
सुंदर सोनेरी पहाट ही येणारच असते.

  शुभेच्छा.

Comments

Popular Posts